S4 – Formula to Success – यशाचा एस 4 फॉर्म्युला (Mantra for Success) अभ्यास करणे आता आणखी सोपे

S4 – Formula to Success | यशाचा एस 4 फॉर्म्युला |(Mantra for Success)

प्रिय मित्रांनो,

आपण आता परीक्षेच्या तयारीच्या महत्वाच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहात. म्हणून आज, मी आपल्याला अत्यंत उपयोगी असा यशाचा कान मंत्र देणार आहे म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं झाल तर. परीक्षेतील यशाचा फॉर्म्युला देणार आहे. माझ्या फॉर्म्युलाचे नाव आहे यशाचा एस 4 फॉर्म्युला. कारण मी आपल्याला ४ स (s) बद्दल सांगणार आहे. या ४ स (s) सोबत तुम्ही गट्टी केली म्हणजे तुम्हाला परीक्षेचा ताण न वाटता त्यात मजा यायला लागेल. हो मित्रानो, परीक्षा ही एक मजा अनुभवण्याची घटना आहे.

चला तर बघूया ४ स (s) :

पहिला स (s) :

स (S) = सराव :

कुठल्याही परीक्षेच्या वेळेला तुम्ही अभ्यास करता ह्यात काही विशेष नाही. परंतु परीक्षा जवळ आल्यावर आपल्याला आपला मागचा अभ्यास विसरायला होतच नाही का? मग तोच अभ्यास विसरायला लागू नये म्हणून आपण योग्य वेळी सराव करायला हवा. योग्य तितका सराव हा करायलाच हवा. शिवाय हा सराव करताना अगदी जणू काही खरी परीक्षाच देत आहोत या पद्धतीने करायला हवा.

या सरावाच्या अनेक पद्धती आज उपलब्ध आहे त्यातील काही मी सुचवतो:

· जुन्या प्रश्न पत्रिका सोडवणे :

आपण अगदी पारंपारिक रिती नुसार म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशी एक पद्धत सरावासाठी वापरतो ती म्हणजे जुन्या प्रश्न पत्रिका सोडवणे. ही पद्धत अतिशय योग्य आहे. ही सोपी व शास्त्रशुद्ध पद्धत म्हणून वापरता येते. या पद्धतीमुळे आपल्याला प्रश्न प्रकार, प्रश्नाचे आदर्श उत्तर मिळते. त्यात वापरायला हवी असलेली उत्तर लेखनाची भाषा याचा योग्य आणि पुरेसा सराव होतो. शिवाय, या पद्धतीमध्ये आपण वेळ लावून प्रश्न पत्रिका सोडवली तर आपल्याला वेळचे नियोजन करायला सोपे जाते. तसेच, आपली क्षमता तपासणी ही आपसूक घडतेच.

· पाठांतर :

पाठांतर करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यात आपण नेहमी वापरतो ती म्हणजे पुस्तक वाचन करणे आणि नंतर पुस्तक बंद करून आठवते का ते पाहणे. या पद्धतीमध्ये अनेक वेळा आपल्याला पाठांतर ही गोष्ट कंटाळवाणी वाटते आणि आपण सोडून देतो. म्हणून आणखी एक पद्धत मी आपल्याला सुचवेल ती म्हणजे मोबाईलचा वापर. आता आपल्याला वाटेल मोबाईल चा आणि पाठांतर चा काय संबंध. पण या मोबाईल मध्ये Voice Recorder नावाचे App असते. त्यात आपण आपला आवाज रेकॉर्ड करून नंतर हवा त्यावेळी ऐकू शकतो. म्हणजे आपण एकदा वाचन करून, जेव्हा शक्य होईल तेव्हा फक्त हेडफोन लावा. गाणे ऐकतो तसे आपला अभ्यास ऐका. त्यामुळे तुम्हाला कंटाळा येणार नाही. तसेच अभ्यास सुद्धा होतो.

· सहवाचन / सोबत अभ्यास :

या पद्धती मध्ये आपण आपल्या गुप मधील सर्व मित्र मैत्रिणी एकत्र येऊन खेळ खेळल्या प्रमाणे अभ्यास एकत्र करायचा. यात एकाने जोराने वाचन करावे आणि दुसऱ्याने ऐकावे. ज्यामुळे आपल्या कानावर अभ्यास येईल. शिवाय, एखादा भाग नाही कळाला तर ज्याला कळला तो त्याचे स्पष्टीकरण देऊ शकतो. यात मजा वाढवण्यासाठी आपण प्रश्नोत्तरे, वाद-विवाद, निबंध – पत्र लेखन अशा छोट्या स्पर्धा घेऊ शकतो. त्यात आपल्याला आपणच छोटे बक्षिसे देऊ शकतो.( लवकरच असा खेळ Online आणण्याचा माझा प्रयत्न आहेच).

· सहजता :

आपल्या सरावात आपण अत्यंत महत्वाची गोष्ट करणे गरजेची आहे ती म्हणजे आपल्या अभ्यासातील आपल्या क्षमते नुसार प्रश्नांचा अग्रक्रम ठरवणे. आपल्याला हव्या असलेल्या ठराविक मार्क नुसार विषयांचा अग्रक्रम ठरवावा. त्यातील काठीण्य पातळी ओळखून प्रश्नांची विभागणी करावी. त्या विषयी कमी अधिक प्रमाणात सरावाला प्राधान्य द्यावे.

दुसरा स (s) :

स (S) = सातत्य :

आपण अभ्यास करतो त्याचा सराव करावा. आपण त्याच्या पद्धती बघितल्या त्याचा अवलंब करायला लागलो. त्यामुळे झालो पास असे नुसते होणार नाही. तुम्हाला ती गोष्ट परत परत करावी लागेल. म्हणजेच त्यात सातत्य असणे गरजेचे आहे. उदा. तुम्ही आज भरपेट जेवण केले आणि उद्या नाही केले असे चालेल का ? नाही न. आपल्याला सातत्य पूर्ण अभ्यास करावा लागेल. त्याचा सराव सतत करावा लागेल. म्हणजे आपल्याला ते पक्के लक्षात राहील. परीक्षेच्या वेळेत आपण ते कदापि विसरणार नाही.

तिसरा स (s) :

स (S) = समजणे :

आपण बघितले कि अभ्यास आणि सराव ही सातत्य पूर्वक करायची गोष्ट आहे ते एकदा करून सोडून देता येणार नाही परंतु तुम्ही आज अभ्यास केला त्याचा सराव सुद्धा छान चालू आहे आणि तुम्हाला त्याबद्दल पुरेसे ज्ञान मात्र नसेल तर, म्हणजे अभ्यास आपल्या पक्का लक्षात राहणे किंवा पाठ होणे शिवाय आपल्याला तो वेळेत आठवून आपण आपली प्रश्न पत्रिका बिनचूक सोडवणे यात आणि आपल्याला अभ्यास समजणे यात बरेच अंतर आहे कसे ते बघू :

तुम्हाला 5 आणि 10 ची बेरीज करायला सांगितली तर उत्तर सोप्प आहे. 5+10=15 हे तुम्ही एक सेकंदात सांगू शकता, हो ना? कारण तुम्हाला बेरीज कशी करायची हे समजले आहे म्हणून उदा. 5 ऐवजी 7 घेतले तर उत्तर 17 येणार हे तुम्ही बेरीज करून सांगू शकता. कारण तुम्ही 5+10=15 हे पाठ केलेले नव्हते. त्या मागे असलेली बेरीज ही संकल्पना तुम्हाला नीट समजली होती. म्हणजे गणित सारख्या काही विशेष विषयात आपल्याला त्यात वापरलेल्या संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. एकदा ती संकल्पना तुम्हाला कळली कि तुम्ही कुठलही गणित अगदी सहज सोडवू शकता.

चौथा स (s) :

स (S) = समाधान :

आपल्याला अभ्यास करायला आवडायला लागलंय. त्याचा सराव सुद्धा छान चालू आहे. त्या मध्ये सातत्य ठेवून आपण त्यातील संकल्पना नीट समजून घेण्याचा प्रयत्न देखील करत आहात. पण अत्यंत महत्वाचे म्हणजे आपल्या सर्व शंकांचे योग्य समाधान होणे गरजेचे आहे. तसे होत नसेल, तर आपण आपल्या मित्र, पालक किंवा शिक्षकांच्या मदतीने त्याचे समाधान शोधायला हवे.

दुसरे महत्वाचे म्हणजे आपण नेहमी समाधानी राहून आपल्या क्षमता आणि आपली मेहनत या प्रमाणे मिळणाऱ्या परिणामावर खुश राहायला हवे. त्यातून नाराज होता कामा नये. त्याचा आपल्या अभ्यासावर विनाकरण वाईट परिणाम दिसू शकतो.

मित्रांनो मला खात्री आहे कि या एस 4 फॉर्म्युलाचा वापर करून आपण परीक्षेचा अभ्यास केला तर आपण नक्की यशस्वी व्हाल. आपण खूप चांगला अभ्यास करा. यशोशिखरावर आपला नगारा वाजू द्या.

लवकरच आपल्याशी पुन्हा एकदा परीक्षेतील ताण नियोजन विषयावर बोलेल…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top